भोर तालुका प्रतिनिधी विलास धोंगडे नसरापुर – मौजे माळेगाव येथील प्रगतिशील शेतकरी श्री. दत्तात्रय शंकर निगडे यांनी मागील सहा वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा ध्यास घेतला आहे. रासायनिक अवलंबनापासून दूर जात, पूर्णतः घरगुती निविष्ठा तयार करून शाश्वत शेतीचा उत्कृष्ट पर्याय त्यांनी उभा केला आहे. त्यांच्या शेतातून पिकणारा भाजीपाला व अन्नधान्य पूर्णतः विषमुक्त असल्याने ग्राहकांच्या आरोग्याला सुरक्षित ठेवण्याचे महत्त्वाचे काम ते सातत्याने करत आहेत.
स्थानिक ग्राहकांपासून ते शहरातील आरोग्य-जाणिवा असलेल्या ग्राहकांपर्यंत त्यांच्या सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी असून, ‘स्वच्छ जमीन – शुद्ध अन्न’ हा त्यांचा संकल्प प्रत्यक्षात उतरला आहे.
सेंद्रिय शेती क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. आचार्य देववृत यांच्या हस्ते त्यांना राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रसंगी राज्याचे कृषि विभागाचे मुख्य सचिव श्री. विकास सिंग रस्तोगी, आयुक्त कृषि श्री. सुरज मांढरे यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
श्री. निगडे यांचा सेंद्रिय शेतीचा आदर्श आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, रासायनिक मुक्त अन्नधान्याकडे वाटचाल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते एक उज्ज्वल उदाहरण ठरत आहेत.
— सेंद्रिय शेतीचा मार्ग दाखवणारा माळेगावचा ‘हरित क्रांतीकारक’ शेतकरी!










