भोर तालुक्यातील अडवली गावामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली.
परगावाहून आलेल्या एका व्यक्तीने, जो अडवली येथील लग्नसमारंभ कार्यालयात काम करत असून, बाबासाहेबांप्रती असलेल्या प्रेमातून ही जयंती विशेष उत्साहाने साजरी केली. बाबासाहेबांचे विचार व कार्य जगभर प्रसिद्ध असून, त्याच प्रेरणेतून या व्यक्तीने स्थानिक नागरिकांना एकत्र करत छोटेखानी पण अत्यंत अर्थपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाला गावातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी सरपंच मोहन काटकर, पोलीस पाटील दिलीप इंगुळकर, विलास इंगुळकर, बाबू ननवरे, महादेव गायकवाड, सुभाष गायकवाड, भागाजी गायकवाड, विकास कांबळे यांच्यासह ग्रामस्थांचा सहभाग उल्लेखनीय होता.
मूळचे नांदेड येथील रहिवासी असलेले श्री. एडके (मामा) हे नोकरीच्या निमित्ताने अडवली येथे स्थायिक झाले असून, त्यांनी या जयंतीचे आयोजन करून सामाजिक एकात्मतेचा आदर्श निर्माण केला. कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.
या उपक्रमामुळे अडवली गावात सामाजिक सलोखा व प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांकडून या आयोजनाचे कौतुक करण्यात येत आहे.









