राजगड तालुक्यातील घेवंडे येथे रविवारी (दि. १२) अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, शेतात पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंप बसविताना विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेत निव्ही-घेवंडे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामाजी भाऊराव गायकवाड (वय ५०) आणि त्यांचे बंधू दत्तात्रेय उर्फ दत्तू भाऊराव गायकवाड (वय ५५) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घेवंडे गावातील हे दोघे भाऊ गुंजवणी धरणाच्या पाणलोट (फुगवटा) क्षेत्रात शेतीसाठी कृषिपंप बसविण्याचे काम करीत होते. दुपारच्या सुमारास मोटार दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह आल्याने दोघांनाही जोराचा विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते थेट खोल पाण्यात पडले.
ही घटना लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाला कळविण्यात आले. त्यानंतर पोलीस अधिकारी अमित देशमुख, राजेंद्र आवदे, शुभम कदम तसेच बचाव पथकातील सदस्य घटनास्थळी दाखल झाले.
सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी अंदाजे ६.३० वाजण्याच्या सुमारास दामाजी गायकवाड यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र, त्यांचे बंधू दत्तात्रेय गायकवाड यांचा मृतदेह उशिरापर्यंत सापडू शकला नाही. अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले असून रात्री सुमारे १० वाजता शोधमोहीम थांबविण्यात आली. पुढील शोधमोहीम सोमवारी (दि. १३) सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
या बचावकार्यात हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे अध्यक्ष तानाजी भोसले, गणेश सपकाळ (पोलीस पाटील), उत्तम पिसाळ, विक्रम बिरामने, संदीप सोलस्कर, संजय चोरघे, समीर जाधव आदींनी सक्रिय सहभाग घेतला.
दामाजी गायकवाड हे निव्ही-घेवंडे समूह ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे घेवंडे परिसरासह संपूर्ण राजगड तालुक्यात शोककळा पसरली असून, दोन्ही भावांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.









