भोर तालुक्यातील पारवडी येथील कु. गायत्री सुरेश लिमण हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत, कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात स्थान मिळवले आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.
गायत्री हिचे वडील सुरेश केशव लिमण हे शेती व्यवसाय करत असून आई अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. अत्यंत साध्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातून येत असतानाही पालकांनी शेतीमजुरी करून मुलीच्या शिक्षणासाठी आणि पोलिस भरतीच्या तयारीसाठी आवश्यक खर्च केला.
गायत्रीने दहावीमध्ये 86 टक्के तर बारावीमध्ये 82 टक्के गुण मिळवत शिक्षणातही आपली गुणवत्ता सिद्ध केली. तिचे शालेय शिक्षण सरस्वती विद्यालय, अंबवणे (ता. राजगड) येथे झाले. पुढे पोलिस भरतीसाठी तिने गुरुकुल अकॅडमी, बारामती येथे बोंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. तसेच पुणे ग्रामीण पोलिस दलातील मंगेश शिंदे सर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
गेल्या 1 ते 2 वर्षांपासून सातत्याने शारीरिक व लेखी परीक्षेची तयारी करत अखेर तिने यश संपादन केले. कठीण परिस्थिती असूनही हार न मानता केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
गायत्रीच्या या यशाबद्दल पारवडी गावासह भोर तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिची ही यशोगाथा इतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
शुभेच्छुक :
जय मल्हार मित्र मंडळ पारवडी, छत्रपती प्रतिष्ठान मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळ पारवडी.









