पुणे : निसर्ग संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे हवेली आपत्ती व्यवस्थापन, पुणे जिल्हा येथील श्री. तानाजी भोसले यांना निसर्गसेवक संस्थेतर्फे दिला जाणारा यंदाचा ‘निसर्गसेवक पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सिंहगड-वेल्हा परिसरात भोसले यांनी अनेक वर्षांपासून संकटग्रस्त प्राणी-पक्ष्यांचे रक्षण, जखमी वन्यजीवांना उपचारासाठी मदत तसेच अपघातग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करून जीव वाचवण्याचे कार्य सातत्याने केले आहे. दुर्गम भागातही तत्परतेने धाव घेऊन सेवा देण्यामुळे त्यांची ओळख एक संवेदनशील आणि कार्यतत्पर समाजसेवक म्हणून निर्माण झाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संस्थेने त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.
निसर्गसेवक संस्थेतर्फे आयोजित हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत कर्वेनगर, पुणे येथील सेवासदन इंग्लिश मीडियम विद्यालय (दीनानाथ मंगेशकर रुग्णालय शेजारी) येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात “वाढत्या पुण्याची पर्यावरणीय आव्हाने” या विषयावरील निसर्गसेवक विशेषांकाचे अनावरण करण्यात येणार असून शालेय स्तरावरील निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभही होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध पर्यावरण पत्रकार संतोष शिंत्रे भूषवणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान, विशेषांकाचे अनावरण व बक्षीस वितरण होणार आहे.
निसर्ग संवर्धनाबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी निसर्गसेवक संस्थेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
“निसर्ग सेवक पुरस्काराने जबाबदारी वाढली”
“निसर्ग सेवक संस्थेकडून मिळालेला ‘निसर्ग सेवक’ पुरस्कार हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून निसर्ग संवर्धन, जखमी प्राण्यांवरील उपचार आणि आपद्ग्रस्तांना मदत या कार्याची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. हा पुरस्कार मला पुढील काळात अधिक निष्ठेने व समर्पणाने सेवा कार्य करत राहण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.”
— श्री. तानाजी भोसले
(हवेली आपत्ती व्यवस्थापन, पुणे जिल्हा)









