भोर तालुक्यातील गवडी गावचे ग्रामविकास अधिकारी, एका खाजगी इसम व सेवानिवृत्त विस्तार अधिकाऱ्याविरुद्ध लाच मागणी व लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी (दि. १९) धडक कारवाई केली. घरकुल योजनेचा दुसरा हप्ता मंजूर करून खात्यावर जमा करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी महादेव नामदेव सालगडे (वय ४८, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत गवडी, ता. भोर), किसन रामचंद्र तोसर (वय ५२, खाजगी इसम) तसेच दत्तात्रेय दादासाहेब खंडाळे (वय ५८, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी) यांच्याविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यवसायाने शेतकरी असून त्यांना सन २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ मंजूर झाला होता. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झाला. त्यानंतर त्यांनी घराचे बांधकाम फाउंडेशनपर्यंत पूर्ण केले. त्याचे फोटो व अहवाल पंचायत समिती भोर येथे सादर करण्यात आला होता.
दरम्यान, तक्रारदार हे दुसऱ्या हप्त्याबाबत चौकशी करण्यासाठी १ एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयात गेले असता त्यांना संबंधित क्लार्ककडून ग्रामविकास अधिकारी महादेव सालगडे यांनी त्यांचा दुसरा हप्ता प्रलंबित ठेवण्यास सांगितल्याचे समजले. त्यानंतर तक्रारदार यांनी सालगडे यांची भेट घेतली असता दुसरा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. याबाबत तक्रारदार यांनी ६ एप्रिल रोजी एसीबी पुणे येथे तक्रार दिली.
तक्रारीनंतर एसीबीने ९ एप्रिल रोजी पडताळणी केली असता ग्रामविकास अधिकारी सालगडे यांनी स्वतःसाठी ५ हजार रुपये तसेच सेवानिवृत्त विस्तार अधिकारी खंडाळे व गोगरे यांच्यासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये, असे एकूण १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच सेवानिवृत्त विस्तार अधिकारी खंडाळे यांनी तक्रारदाराला लाच देण्यास प्रोत्साहन दिल्याचेही चौकशीत समोर आले.
यानंतर २२ एप्रिल रोजी पुन्हा पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तक्रारदार ५ हजार रुपये घेऊन गेले असता “पाच हजारात काम होणार नाही, खंडाळे आणि गोगरे यांनाही पैसे द्यावे लागतील,” असे सांगून पुन्हा १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
त्यानुसार एसीबीने मंगळवारी किवत गावच्या हद्दीत भोर-मोहरडे रोडलगत सापळा रचला. तक्रारदार यांनी मागणीनुसार १५ हजार रुपयांची रक्कम आरोपी महादेव सालगडे यांच्याकडे देऊ केली असता त्यांनी ती रक्कम सोबत असलेल्या किसन तोसर याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तोसर याने लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दुपारी १.०७ वाजता दोघांना रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे व सहायक पोलीस आयुक्त नीता मिसाळ यांच्या पथकाने केली.
दरम्यान, शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमांकडून कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे.






