कुडजे येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरिणाला प्राणीमित्रांनी तत्परता दाखवत जीवदान दिले. आज सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास कुडजे गावचे पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांनी जखमी हरिणाबाबत माहिती दिल्यानंतर ‘फ्रेंड्स ऑफ रेप्टाइल्स अँड एन्व्हायर्नमेंटल सेव्हिंग ट्रस्ट’चे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक पाहणीत संबंधित हरिण हे काल रात्री भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी शेतामध्ये येऊन लपल्याचे निदर्शनास आले. मात्र या हल्ल्यात हरिण जखमी झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राणीमित्रांनी तात्काळ बचाव मोहीम हाती घेतली.
जखमी हरिण शेतालगतच्या पाणथळ भागात अडकले होते. काटेरी झुडपे, चिखल आणि इतर अडचणींवर मात करत बचाव पथकाने हरिणापर्यंत पोहोचून अत्यंत काळजीपूर्वक त्याला बाहेर काढले. त्यानंतर प्राथमिक उपचारासाठी हरिणाला तात्पुरत्या स्वरूपात ‘झापुरझा कला व संस्कृती संग्रहालय’ येथे हलविण्यात आले.
संस्थेचे सदस्य कार्तिक माने यांनी सांगितले की, “हरिण आणि सशासारखे वन्य प्राणी अत्यंत भित्रे असतात. अगदी छोट्या आवाजामुळेही ते तणावात जाऊन शॉकमुळे मृत्यूमुखी पडू शकतात. त्यामुळे अशा प्राण्यांना शांत, अंधाऱ्या आणि सुरक्षित ठिकाणी ठेवणे अत्यंत आवश्यक असते.”
प्राथमिक काळजी घेतल्यानंतर पुढील उपचार व आवश्यक कार्यवाहीसाठी जखमी हरिण वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
या बचाव मोहिमेत ‘फ्रेंड्स ऑफ रेप्टाइल्स अँड एन्व्हायर्नमेंटल सेव्हिंग ट्रस्ट’चे चेतन निगडे, सागर बावळे, परिक्षीत शिंदे, लखन पिठले तसेच झापुरझा येथील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.





