भोर प्रतिनिधी तबरेज खान : महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागात सहाय्यक निबंधक म्हणून पदभार स्वीकारलेल्या आदिनाथ पालवे यांचा सहकार भारती भोर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. सहकार भारतीचे तालुका अध्यक्ष सदाशिव धुमाळ यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार सोहळ्यास सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात बोलताना पालवे म्हणाले की, “येत्या काही दिवसांत तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या सचिवांसाठी मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करून सहकार व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राहील.”
सहकार क्षेत्रातील पारदर्शकता, व्यावसायिकता आणि सामाजिक बांधिलकी या तीन स्तंभांवर आधारित कार्यसंस्कृती रुजवण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.
धुमाळ यांनी सहकार भारतीच्या प्रवासाचा आढावा घेत सांगितले की, १९७८ मध्ये स्थापन झालेली ही संघटना गेली ४७ वर्षे देशभरातील पाचशेहून अधिक जिल्ह्यांत प्रभावीपणे कार्यरत आहे. “बिना सहकार नहीं उद्धार” या मूळ ध्येयवाक्याला “बिना संस्कार नहीं सहकार” अशी जोड देत सहकाराला मूल्याधिष्ठित दिशा देणे हा संघटनेचा मूलभूत विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.
धुमाळ पुढे म्हणाले की, सहकारी साखर कारखान्यांमधील कामकाजाचा अनुभव असल्याने तालुक्यातील सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी सहकार भारतीमार्फत ठोस प्रयत्न केले जातील.
कार्यक्रमात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे भोर तालुका विभागीय विकास अधिकारी मारणे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका महिला प्रमुख सौ. आशाताई शिवतरे तसेच सहकार भारतीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ही घटना भोर तालुक्यातील सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा देणारी ठरली आहे. असे कार्यक्रम कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करून सहकार चळवळ अधिक मजबूत करण्याचे कार्य करतात.










