माळेगाव (ता. भोर) : ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था, नसरापूर संचलित विजय मुकुंद आठवले माध्यमिक विद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त वनाधिकारी व निसर्ग कवी लक्ष्मण शिंदे उपस्थित होते. मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेल्या कवितांचा ‘नवे क्षितिज’ हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. कवी लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या प्रकाशन सोहळ्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याचे कौतुक करत सातत्याने वाचन आणि लेखन केल्यास साहित्य क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, असे मार्गदर्शन केले.
मराठी भाषेप्रती विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आणि अभिमान निर्माण व्हावा या उद्देशाने विद्यालयात निबंध लेखन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नाट्य सादरीकरण, गीत गायन तसेच ‘माझी मराठी स्वाक्षरी’ अशा विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला रंगत आणली. विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमास ज्ञानप्रकाश शिक्षण संस्थेचे संचालक तथा मराठी विभाग प्रमुख विक्रम कदम, गणेश पालकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेवती पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सोनावणे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश पालकर यांनी केले.
विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ‘नवे क्षितिज’ या काव्यसंग्रहाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्याम दलाल, उपाध्यक्ष काशिनाथराव पालकर व कार्याध्यक्ष डॉ. गणेश हिवरेकर यांनी विशेष कौतुक करून सर्व बालकवींना शुभेच्छा दिल्या.
मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळालेली ही प्रेरणा भविष्यात नवे साहित्यिक घडविणारी ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










