पुणे : महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर दरवर्षी हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक भेट देत असतात. दुर्गम डोंगररांगा, कडे-कपारी आणि कठीण चढाईमुळे अनेकदा अपघात घडण्याच्या घटना समोर येतात. अशा वेळी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करून सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनातील विविध संस्था, मावळे आणि स्थानिक कार्यकर्ते मोठ्या धैर्याने कार्य करत असतात. या धाडसी कार्यकर्त्यांचा सन्मान नुकताच करण्यात आला.
स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारक, सिंहगड रोड येथे आयोजित कार्यक्रमात गड-किल्ल्यांवरील आपत्कालीन बचाव कार्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या विविध संस्था व कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम यांचा प्रथम सन्मान करण्यात आला. त्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीम, शिवजन्मभूमी रेस्क्यू टीम (जुन्नर) तसेच राजगड पुरातत्त्व विभागातील बापू साबळे, विशाल पिलावरे, दीपक पिलावरे, किल्ले विसापूर येथील रोहित नगीने, राहुल वाघमारे, अनिकेत आंबेकर, सागर कुंभार, नितीन विधाटे (वन परिमंडळ जुन्नर), देविदास मिसाळ (वनरक्षक, शिवनेरी), कैलास झरांडे व स्वप्नील सांबरे (सिंहगड वन समिती), हरिदास वऱ्हाड (पाटबंधारे विभाग, खडकवासला धरण) आणि दीपक घोरपडे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात सतत अपघात होणाऱ्या सिंहगड, राजगड, तोरणा आणि शिवनेरी या किल्ल्यांवर आपत्कालीन मदतकार्य अधिक प्रभावी व्हावे यासाठी रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड आणि श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान यांच्या वतीने चार अत्याधुनिक स्केड स्ट्रेचर प्रदान करण्यात आली.
या स्ट्रेचरच्या साहाय्याने अपघातग्रस्त व्यक्ती अथवा मृतदेह दरी, खोल खळगे, कडे-कपारी किंवा कड्याखालून सुरक्षितपणे बाहेर काढणे सुलभ होते. तसेच आवश्यकतेनुसार या स्ट्रेचरवरून अपघातग्रस्त व्यक्तीला हेलिकॉप्टरद्वारे एअर लिफ्ट करण्याची सुविधाही उपलब्ध होते. त्यामुळे गड-किल्ल्यांवरील बचाव कार्य अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे करता येणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे होते. प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, रोटरी क्लब सिंहगड रोडचे अध्यक्ष अमेय पासलकर, सचिव प्रियांका लागू, इंद्रजितसिंह हिंदुराव घोरपडे गजेंद्रगडकर, सतीश खाडे (डायरेक्टर) आणि दीपक घोरपडे उपस्थित होते. यावेळी सिंहगड, तोरणा, रायगड, शिवनेरी आदी किल्ल्यांवरील आपत्कालीन बचाव पथकातील कार्यकर्ते तसेच रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी गड-किल्ले हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा ऐतिहासिक ठेवा असल्याचे सांगितले. या ठेव्याचे संरक्षण करताना आपत्कालीन परिस्थितीत जीव धोक्यात घालून मदत करणाऱ्या बचाव पथकांचे कार्य अत्यंत मोलाचे असून त्यांचे कौतुक शब्दांत मावणारे नाही, असे त्यांनी नमूद केले.
आपत्कालीन बचाव पथकातील सदस्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लबने यापूर्वी दिलेल्या स्ट्रेचरच्या साहाय्याने शेकडो अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यात यश मिळाले असल्याचे सांगितले. नव्याने उपलब्ध झालेल्या अत्याधुनिक स्ट्रेचरमुळे भविष्यातही अनेकांचे जीव वाचविण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका देशपांडे यांनी केले.










