आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

एशियन कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ज्ञान प्रबोधिनी संस्थेला क्षेत्रभेट; ग्रामीण विकास उपक्रमांची घेतली माहिती


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम (CEP) अंतर्गत वेल्हे येथील एशियन कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी ज्ञान प्रबोधिनी संस्था, वेल्हे येथे क्षेत्रभेट देत ग्रामीण विकास आणि सामाजिक कार्याची प्रत्यक्ष माहिती घेतली. विद्यार्थ्यांना समाजकार्याची जाणीव व्हावी आणि ग्रामीण भागातील उपक्रमांचा अनुभव मिळावा, या उद्देशाने या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.

 

या भेटीदरम्यान ज्ञान प्रबोधिनी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रमांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी राबविले जाणारे महिला बचत गट, किशोरींसाठी आयोजित कौशल्य विकास शिबिरे, युवकांसाठी घेतल्या जाणाऱ्या मार्गदर्शन कार्यशाळा तसेच सांस्कृतिक प्रबोधनाचे उपक्रम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

संस्थेच्या समन्वयक प्रतिभा स्वामी यांनी माहितीपटाच्या माध्यमातून संस्थेच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांसमोर मांडला. ग्रामीण भागातील युवक-युवतींना सक्षम करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्न करत असून शेती, उद्योग आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर संस्थेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. “एक ध्येय – एक राष्ट्र” या विचारातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ज्ञान प्रबोधिनी संस्था कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

या क्षेत्रभेटीत एशियन कॉलेजचे बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामीण विकासातील विविध उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि रोजगाराच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांनी संवाद साधत अनेक प्रश्न विचारले. या चर्चेमुळे विद्यार्थ्यांना समाजकार्याची प्रत्यक्ष समज मिळाली.

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा डॉ. अनिता साप्ते, उपाध्यक्ष आनंद साप्ते, सचिव अनिल साप्ते तसेच प्राचार्या डॉ. मंजिरी कारेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

 

यावेळी प्रा. गौरी रेणुसे, प्रा. सौम्या माळगावकर, प्रा. जी. के. जगताप, प्रा. तुषार बारगजे, प्रा. प्राची सुतार यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी प्रियंका पवार, आकाश गायकवाड आणि विमल गायकवाड उपस्थित होते.

 

या क्षेत्रभेटीद्वारे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!