आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर राज्यातील रिक्त जागांसाठी एप्रिलमध्ये मतदान; ६ मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार


राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य तसेच थेट निवडून आलेल्या सरपंचांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. पारंपारिक पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रिया एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.

 

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, या पोटनिवडणुकीची प्रक्रिया ३० मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे. त्या दिवशी संबंधित तहसीलदारांकडून निवडणुकीची अधिकृत नोटीस प्रसिद्ध केली जाईल.

 

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया ७ एप्रिल २०२६ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज सादर करता येणार आहेत. मात्र, ११ एप्रिल (शनिवार) व १२ एप्रिल (रविवार) या सुट्टीच्या दिवसांमध्ये अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

 

नामनिर्देशनपत्रांची छाननी १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होऊन पूर्ण होईपर्यंत चालणार आहे. त्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्याच दिवशी दुपारी ३ नंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

 

जर संबंधित जागेसाठी मतदानाची गरज भासल्यास, मतदान प्रक्रिया २८ एप्रिल २०२६ रोजी पार पडेल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी राहील. मात्र, नक्षलग्रस्त व दुर्गम भागांमध्ये, जसे गडचिरोली व गोंदिया जिल्हे, येथे मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंत ठेवण्यात आली आहे.

 

मतमोजणी २९ एप्रिल २०२६ रोजी करण्यात येणार असून, त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित तहसीलदार निश्चित करतील.

 

या निवडणूक प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिकृत अधिसूचना ६ मे २०२६ पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, या पोटनिवडणुकीमुळे रिक्त असलेल्या ग्रामपंचायत जागा पुन्हा भरल्या जाणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराला गती मिळणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!