आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

पुण्यातील दुर्मिळ शोधाची आंतरराष्ट्रीय नोंद; जन्मतः डोळे नसलेल्या सापावर संशोधन प्रकाशित


पुणे : पुणे शहरातील पाषाण परिसरात रेस्क्यू दरम्यान आढळलेल्या जन्मतः डोळे नसलेल्या तस्कर (सामान्य ट्रिंकेट) सापाची आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नोंद झाली असून अमेरिकेतील Reptiles & Amphibians या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये या संशोधनाचा लेख प्रकाशित झाला आहे. सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे आणि पुण्याचे सर्प रक्षक अनिल कानस्कर यांच्या संयुक्त संशोधनामुळे महाराष्ट्रातील सर्प संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. या संशोधन कार्यात पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे.

 

१९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी पुण्यातील पाषाण, सुतारवाडी येथील पीएमसी शाळेजवळील पार्किंग परिसरातून रेस्क्यू कॉलदरम्यान हा साप पकडण्यात आला. हा साप तस्कर (Coelognathus helena) जातीचा असून सुमारे २० सेंमी लांबीचा होता. निरीक्षण करताना या सापामध्ये डोळे पूर्णतः नसल्याचे दिसून आले. डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले होते आणि डोळ्यांची बाहुली पूर्णपणे अनुपस्थित होती. तसेच त्याच्या जबड्याच्या रचनेतही काही प्रमाणात विकृती आढळून आली. ही बाब लक्षात आल्यानंतर सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असून याची संशोधनात्मक नोंद करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर या सापाचे निरीक्षण करून संशोधन लेख तयार करण्यात आला.

 

या सापामध्ये आढळलेली विकृती शास्त्रीय भाषेत ‘बायलॅटरल अनऑफथालमिया’ म्हणून ओळखली जाते. बायलॅटरल म्हणजे दोन्ही बाजूंना आणि अनऑफथालमिया म्हणजे डोळे पूर्णतः अनुपस्थित असणे. ही जन्मजात विकृती असून भ्रूणावस्थेत डोळ्यांची प्राथमिक रचना तयार न होणे किंवा तयार होऊन नंतर नष्ट होणे यामुळे ही अवस्था निर्माण होते. यामागे जनुकीय किंवा पर्यावरणीय घटक कारणीभूत असू शकतात. सापांमध्ये अशा प्रकारची विकृती अत्यंत दुर्मिळ मानली जाते. विशेष म्हणजे, तस्कर (Coelognathus helena) या सापामध्ये अशा प्रकारची विकृती आढळण्याची ही पहिली आंतरराष्ट्रीय नोंद असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

 

या सापाच्या डोळ्यांमध्ये व जबड्यात विकृती असली तरी इतर बाबतीत तो निरोगी दिसत होता. त्यामुळे त्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या संशोधनासाठी पुणे वनविभागाचे सहकार्य लाभले असून रफीक शेख आणि गणेश माने यांनी क्षेत्रीय कामात मदत केली.

 

या संशोधनामुळे सापांमधील जन्मजात विकृती, भ्रूण विकास आणि पर्यावरणीय परिणाम यावर पुढील अभ्यास करण्यास मदत होणार आहे. स्थानिक पातळीवर केलेले निरीक्षण आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित होणे ही मोठी वैज्ञानिक बाब मानली जात आहे. सर्प अभ्यासक राहुल शिंदे, अनिल कानस्कर तसेच पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशन यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील सर्प संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!