वेल्हे तालुक्याचे नामकरण शासनाच्या अध्यादेशानुसार ‘राजगड तालुका’ असे करण्यात आल्यानंतर तहसील कार्यालयासह विविध शासकीय विभागांच्या नावात बदल करण्यात आला आहे. मात्र तालुका पंचायत समिती कार्यालयावरील फलक अद्यापही ‘पंचायत समिती वेल्हे’ असाच कायम असल्याने प्रशासनाच्या उदासीनतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
याबाबत नवनियुक्त पंचायत समिती सदस्य गणेश जागडे यांनी गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्याकडे सोमवारी (ता.१६) लेखी निवेदन देत संबंधित फलक तातडीने बदलून ‘राजगड पंचायत समिती’ असा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
जागडे यांनी निवेदनात नमूद केले की, तालुक्यातील जनतेच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी तसेच जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या नावाने तालुक्याचे नामकरण केले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही निवडणूक आयोगाकडून ‘राजगड तालुका’ या नावानेच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. त्यामुळे पंचायत समितीचे अधिकृत नामकरण तातडीने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी सांगितले की, गणेश जागडे यांच्याकडून लेखी निवेदन प्राप्त झाले असून ‘राजगड’ नावाचा नवीन फलक तयार करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलक उपलब्ध झाला नव्हता. लवकरच नवीन फलक बसविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.










