आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

किल्ले राजगडावर आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा व रेस्क्यू टीम तैनात करण्याची मागणी पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आमदार शंकर मांडेकर यांचे जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन; सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांवर भर


भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या किल्ले राजगडावर वाढत्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन वैद्यकीय यंत्रणा तसेच प्रशिक्षित रेस्क्यू टीम कायमस्वरूपी तैनात करण्यात यावी, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. बुधवार (ता.१८) रोजी हे निवेदन सादर करण्यात आले.

स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ऐतिहासिक ओळख असलेल्या किल्ले राजगडाला वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक, गिर्यारोहक व शिवप्रेमी भेट देत असतात. अलीकडील काळात गडाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यानंतर पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली असून शनिवार-रविवार तसेच सुट्ट्यांच्या दिवशी हजारोंच्या संख्येने पर्यटक गडावर दाखल होत आहेत. मात्र या तुलनेत गडावर आवश्यक वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित बचाव पथक आणि तातडीची मदत व्यवस्था उपलब्ध नसल्याचे चित्र समोर आले आहे.

गेल्या तीन आठवड्यांत दोन पर्यटकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनांमुळे गडावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उंच डोंगररांग, अवघड चढाईचे मार्ग, मोबाईल नेटवर्कची मर्यादित उपलब्धता आणि तातडीने वैद्यकीय मदत पोहोचण्यास होणारा विलंब यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ व ट्रेकर्स यांनीही निदर्शनास आणून दिले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार मांडेकर यांनी प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन किल्ल्यावर कायमस्वरूपी आपत्कालीन वैद्यकीय केंद्र सुरू करावे, प्रशिक्षित रेस्क्यू टीम तैनात करावी, आवश्यक डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, पोलीस बंदोबस्त वाढवावा, पायथ्याशी रुग्णवाहिका सज्ज ठेवावी तसेच स्ट्रेचर, रोप रेस्क्यू किट, वायरलेस यंत्रणा आणि इतर अत्याधुनिक बचाव साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.

तसेच गडावर मार्गदर्शक सूचना फलक, धोकादायक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, पर्यटकांसाठी जनजागृती मोहीम आणि आपत्कालीन संपर्क यंत्रणा उभारण्याची आवश्यकता देखील त्यांनी निवेदनात नमूद केली आहे. पर्यटकांची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे हा गंभीर प्रश्न समोर आला आहे. किल्ले राजगडावर आपत्कालीन सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरही पाठपुरावा करण्यात येणार आहे.”

— शंकर मांडेकर, आमदार, भोर विधानसभा मतदारसंघ


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!