वेल्हे, ता. १८ : ग्रँड टूर जागतिक सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था होत असल्याची बाब समोर आली असून या मार्गांवर तात्काळ अवजड वाहनांवर बंदी घालावी, अशी मागणी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तानाजी मांगडे व पंचायत समिती सदस्य संदीप खुटवड यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन राजगड तहसीलदारांकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नसरापूर–वेल्हे रोड तसेच करंजावणे ते कुसगाव शिवापूर या मार्गांवर प्रशासनाने ग्रँड टूर जागतिक सायकल स्पर्धा लक्षात घेऊन कोट्यवधी रुपये खर्च करून विशेष दर्जाचे रस्ते तयार केले आहेत. पुढील तीन वर्षे सायकल स्पर्धा आयोजित करण्याच्या उद्देशाने या मार्गांची निर्मिती करण्यात आली होती.
मात्र स्पर्धा संपल्यानंतर या रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या हे रस्ते नियमित अवजड वाहतुकीसाठी सक्षम नसल्याने रस्त्यांची झपाट्याने झीज होत असून भविष्यात मोठ्या प्रमाणात तुटफुट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या सायकल स्पर्धेसाठी हे मार्ग अपात्र ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यामुळे भविष्यात राजगड तालुक्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा व विविध विकास प्रकल्पांची संधी गमावली जाऊ शकते आणि तालुका विकासापासून वंचित राहील, अशी चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. परिसरातील शेकडो नागरिकांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडे आल्याने तातडीने कारवाई करून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य तानाजी मांगडे व पंचायत समिती सदस्य संदीप खुटवड यांनी भोरचे उपविभागीय अधिकारी तसेच पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडेही यासंदर्भात निवेदन देणार असल्याची माहिती दिली.
याबाबत राजगड तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी सांगितले की, प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) नियम व निर्देशांनुसारच वाहतूक करणे आवश्यक आहे. महसूल विभागाकडून अधिकृत परवाना घेतलेल्या वाहनांनी वाहतुकीदरम्यान पास व परवाना सोबत ठेवणे बंधनकारक आहे. अनधिकृत वाहतूक आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.










