विंझर वार्ताहर समीर कांबळे
येत्या मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी तानाजी मालुसरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दापोडे (ता. वेल्हा) येथे ‘शुभेच्छा समारंभ’ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात सकारात्मक राहून यशाला गवसणी घालण्याचे आवाहन केले.
अत्याधुनिक ज्ञानाची कास धरा: मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. मयूर बनसोडे (नायब तहसीलदार, वेल्हा) उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची आणि विज्ञानाची सांगड घालून सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण कोणतेही शिखर सर करू शकतो.” यावेळी ओंकार मुत्तेवार यांनीही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
विविध दाखल्यांचे वाटप
विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी विद्यालयाने विशेष खबरदारी घेतली आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले उत्पन्न दाखला
रहिवासी दाखला
डोमासाईल (अधिवास) प्रमाणपत्र
जातीचा दाखला असे विविध दाखले,
यांचे अधिकृत वाटप करण्यात आले. यामुळे पालकांची आणि विद्यार्थ्यांची होणारी धावपळ थांबणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
प्राचार्य श्री. पवार सर यांनी परीक्षेच्या पूर्वतयारीबद्दल विद्यार्थ्यांना विशेष टिप्स दिल्या. परीक्षेचा ताण न घेता आत्मविश्वासाने पेपर कसे सोडवावेत, यावर त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. के. तनपुरे यांनी केले, तर सूत्रसंचालन इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या पार पाडले. शेवटी श्री. एस. एस. लिंबरकर यांनी सर्वांचे आभार मानले.
या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, सर्व स्तरांतून विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.










