आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

विठ्ठल मंदिराजवळ बेवारस महिलेचा मृत्यू हृदयद्रावक घटनेने सारोळे गाव हळहळले; ओळख पटवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू


भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील सारोळे गावामध्ये विठ्ठल–रखुमाई मंदिर परिसरात एका बेवारस महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पवित्र मंदिर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नन्ना गायकवाड नावाने ओळख सांगितली जात असलेली परंतु गावातील कोणालाही परिचित नसलेली एक महिला मंदिराजवळ अचानक कोसळलेल्या अवस्थेत आढळून आली. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिक ओंकार महांगरे व साईनाथ धाडवे यांनी तत्परता दाखवत तात्काळ १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला.

 

रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास १०८ रुग्णवाहिकेचे पायलट विशाल कदम व वैद्यकीय कर्मचारी मंदार माळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेची प्राथमिक तपासणी केली असता ती मृत झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस स्टेशनचे कर्मचारी साळुंके व इंगळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

 

यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, भोर येथे पाठविण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 

विठ्ठल मंदिरासारख्या पवित्र स्थळाजवळ घडलेल्या या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून, बेवारस व गरजू व्यक्तींसाठी तातडीची मदत यंत्रणा उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!