आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

महाशिवरात्रीच्या यात्रेत बनेश्वर परिसरात दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल


नसरापूर (ता. भोर) : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र बनेश्वर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असताना दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या घटनेत दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाले असून, परस्परांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात क्रॉस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात्रेच्या गर्दीत घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास बनेश्वर मंदिराजवळील रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या मनोरंजन स्टॉल परिसरात ही घटना घडली. विजय बापुराव सपकाळ (वय ३०, रा. बाजारवाडी, ता. भोर) हे लहान मुलांसाठी मनोरंजन स्टॉल चालवत असताना फंडाच्या पैशांच्या कारणावरून पूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून काही जणांनी तेथे येत वाद घातल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

 

तक्रारीनुसार, संबंधितांनी बेकायदेशीर जमाव जमवून सपकाळ यांना हाताने व काठीने मारहाण केली, शिवीगाळ व दमदाटी केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या नातेवाईकांनाही मारहाण करण्यात आल्याचे नमूद आहे. यावेळी सपकाळ यांच्या आजीच्या हातातील काठी हिसकावून पाठीवर व कंबरेवर मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, या घटनेत फिर्यादी व त्यांच्या आजीला दुखापत झाली. तसेच स्टॉलची तोडफोड करून नुकसान केल्याचीही तक्रार देण्यात आली आहे.

 

दरम्यान, याच घटनेप्रकरणी अनिकेत चंद्रकांत जाधव (वय २५, रा. बाजारवाडी) यांनीही स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा बनेश्वर मंदिर कमानीजवळील जानकीराम मंगल कार्यालय परिसरात फंडाच्या पैशांवरून विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर दुसऱ्या गटाकडून वाद घालण्यात आला. त्यानंतर लाकडी बांबूने डोक्यावर मारहाण करून दुखापत केली तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांच्या दुचाकीचीही तोडफोड करून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

 

दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार राजगड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी गर्दी असताना घडलेल्या या घटनेमुळे काही काळ यात्रेतील वातावरण ढवळून निघाले होते.

 

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदारांकडून सुरू असून, घटनेतील सर्व संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच साक्षीदारांचे जबाब व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!