नसरापूर : मुलींनी शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षण, कायदेविषयक ज्ञान आणि आत्मविश्वास विकसित करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “निर्भय कन्या अभियान” या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण, कायदेविषयक जाणीव आणि आरोग्य जागरूकता या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली. आपल्या मनोगतात त्यांनी मुलींनी शिक्षणासोबत स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व कायद्यांची माहिती आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात पुणे येथील कराटे अँड स्पोर्ट चॅम्पियन अकॅडमीच्या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षक श्री. प्रदीप वाघोले व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाठी-काठीचा वापर करून तसेच कोणतेही शस्त्र नसताना हल्लेखोरापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष सहभाग घेत विविध स्वसंरक्षण तंत्रांचा सराव केला.
दुसऱ्या सत्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती दिली. सायबर गुन्ह्यांपासून बचाव, छेडछाड प्रतिबंधक कायदे, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया तसेच पोलिसांशी संपर्क साधताना घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. महिलांनी अन्याय सहन न करता कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
तिसऱ्या सत्रात नसरापूर येथील शिंदे हॉस्पिटलच्या डॉ. अनुजा दांडेकर-शिंदे यांनी मुलींच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. पोषणमूल्ययुक्त आहार, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी तसेच मानसिक आरोग्याचे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
चौथ्या सत्रात भोर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुरेश शिंदे यांनी महिलांच्या हक्कांसंदर्भातील विविध कायदे व तरतुदी स्पष्ट करत अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढा कसा द्यावा याबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
सायंकाळी ४.३० वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “निर्भय कन्या अभियान” या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सजगता आणि स्वसंरक्षणाची जाणीव निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










