आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू  राज्यात २०२६ मधील ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; महत्वाच्या तारखा निश्चित


मुंबई : राज्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रशासकीय प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने १७ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन आदेश जारी करत प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या हालचालींना वेग आला असून ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील सुधारित तरतुदीनुसार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रशासनाला प्रभाग रचना प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रभाग रचना कशी होणार?

शासन आदेशानुसार तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. सुरुवातीला गुगल अर्थ नकाशांच्या साहाय्याने प्रत्येक गावाचा नकाशा अंतिम केला जाणार आहे. त्यानंतर संबंधित तलाठी व ग्रामसेवक संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभागांची विभागणी व सीमा निश्चित करतील.

त्यानंतर तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांची समिती प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करेल. हा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल. जिल्हाधिकारी आवश्यक दुरुस्त्या करून प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करतील.

नागरिकांना हरकती नोंदविण्याची संधी

प्रारूप प्रभाग रचना तयार झाल्यानंतर त्याला व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार असून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात येतील. प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील आणि अभिप्रायासह अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल.

महत्वाच्या तारखा जाहीर

२० फेब्रुवारी २०२६ – गावांचे नकाशे अंतिम

२७ फेब्रुवारी २०२६ – स्थळ पाहणी व प्रभाग सीमा निश्चिती

०५ मार्च २०२६ – समितीकडून तपासणी

११ मार्च २०२६ – प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

१७ मार्च २०२६ – जिल्हाधिकाऱ्यांकडून आयोगाकडे प्रस्ताव

२३ मार्च २०२६ – राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

३० मार्च २०२६ – प्रारूप प्रभाग रचना मंजूर

 

हरकती प्रक्रिया :

०७ एप्रिल २०२६ – जाहीर सूचना प्रसिद्ध

१३ एप्रिल २०२६ – हरकती सादर करण्याची अंतिम तारीख

२१ एप्रिल २०२६ – सुनावणी

२३ एप्रिल २०२६ – अंतिम अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांकडे

अंतिम टप्पा :

२८ एप्रिल २०२६ – अंतिम प्रभाग रचना आयोगाकडे

०४ मे २०२६ – अंतिम प्रभाग रचना जाहीर

निवडणुकांचा मार्ग मोकळा

मे २०२६ पर्यंत प्रभाग रचना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबविण्याचा शासनाचा प्रयत्न असून नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवून प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!