विंझर वार्ताहर समीर कांबळे
पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र आता वेल्ह्याकडे (राजगड) वळताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने संग्राम थोपटे यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत अभूतपूर्व विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरलेले अमोल नलावडे यांचे नाव आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चेत आले असून, राजगडला ‘लाल दिवा’ मिळणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विजयाचा ‘राजगड’ पॅटर्न आणि नलावडेंचा अनुभव
तालुक्यात तब्बल १४ वर्षांनंतर सत्तांतर घडवून राष्ट्रवादीने ७३ पैकी ५२ जागांवर बहुमत मिळवले आहे. विंझर गटातून दुसऱ्यांदा निवडून आलेले अमोल नलावडे हे केवळ विजयी उमेदवार नसून, त्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. २०१२ मध्ये त्यांच्या पत्नी वसुधा नलावडे यांनी प्रतिनिधित्व केले होते, त्यानंतर २०१७ आणि आता २०२६ मध्ये स्वतः अमोल नलावडे यांनी विजय मिळवत आपली पकड सिद्ध केली आहे.
अमोल नलावडे यांची जमेची बाजू:
प्रशासकीय पकड: शासकीय योजनांची सखोल माहिती आणि अंमलबजावणीचे कौशल्य.
जनसंपर्क: वेल्हे आणि लगतच्या दुर्गम भागातील मतदारांशी दांडगा संपर्क.
राजकीय निष्ठा: कठीण काळात पक्षाशी एकनिष्ठ राहून बालेकिल्ला काबीज करण्याची क्षमता.
कार्यकर्त्यांची ‘एकमुखी’ मागणी, श्रेष्ठींच्या दरबारी काय हालचाली?
राष्ट्रवादीच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “ज्या तालुक्याने पक्षाला कठीण काळात साथ दिली आणि विरोधकांचे गड उद्ध्वस्त केले, त्या राजगडला जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अमोल नलावडे यांच्या अनुभवाचा फायदा संपूर्ण जिल्ह्याला होऊ शकतो, असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजगड वरचढ ठरणार?
जिल्हा परिषदेत ५२ जागांसह राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असले तरी, अध्यक्षपदासाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकांचे गणित आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे पाहता, राजगड तालुक्याला झुकते माप मिळण्याची दाट शक्यता आहे.
आता पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून अमोल नलावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार की इतर समीकरणांचा विचार होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बाईट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रत्येक तालुक्याला संधी दिली असली, तरी राजगड (वेल्हा) तालुक्याला स्वातंत्र्यपूर्व काळापासून अद्याप अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीपूर्वी शब्द दिला होता की, तालुक्यातील सर्व जागा निवडून आणा, त्यानंतर विकासासाठी व अन्य मागण्यांसाठी माझ्याकडे या. तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतो , २०१२ पासून ते २०२६ पर्यंत मी राजगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना अनेक विकासकामे केली आहेत याचा विचार करता
त्यानुसार आता राजगड तालुक्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. हे सर्व प्रयत्न आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनुसार काम करणार आहे .
अमोल नलावडे
नवनियुक्त पुणे जिल्हा परिषद सदस्य










