राजगड, प्रतिनिधी : राजेंद्र रणखांबे
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षने राजगड तालुक्यात ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तब्बल १४ वर्षांनंतर तालुक्यातील सत्तेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून, भाजप नेते संग्राम थोपटे यांच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
तालुक्यातील पंचायत समितीच्या चारपैकी तीन जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच दोन्ही जिल्हा परिषद गटांतही पक्षाने विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. विंझर गटातून अमोल नलावडे तर वेल्हे बुद्रुक गटातून तानाजी मांगडे यांनी विजय मिळवला. मांगडे यांची ही पहिलीच टर्म असली तरी अमोल नलावडे यांनी दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे.
अमोल नलावडे यांना जिल्हा परिषद प्रशासनाचा दांडगा अनुभव असून शासकीय योजनांची सखोल माहिती, व्यापक जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण समाजकार्य यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वी त्यांच्या पत्नी वसुधा नलावडे या २०१२ मध्ये जिल्हा परिषदेत निवडून आल्या होत्या. २०१७ आणि आता २०२६ मध्ये अमोल नलावडे यांनी विजय मिळवत नेतृत्वाची छाप पुन्हा उमटवली आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीत ७३ पैकी तब्बल ५२ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत हालचाली वेगाने सुरू झाल्या असून इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. मात्र राजगड तालुक्याने दोन्ही जिल्हा परिषद गट जिंकून दिल्याने अध्यक्षपदाचा मान राजगडला मिळावा, अशी एकमुखी मागणी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.
तालुक्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. “राजगडचा विकास वेगाने करण्यासाठी तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळणे गरजेचे आहे,” अशी भावना स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
आता अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाणार असून, अध्यक्षपदाच्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. राजगड तालुक्याला हा मान मिळतो की नाही, याबाबत येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.










