धुलीवंदनाच्या निमित्ताने आपटी गावात पारंपरिक संस्कृतीला उजाळा देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये जुन्या परंपरेनुसार वाघ्या–मुरळी नृत्य सादर करण्यात आले. या सादरीकरणाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात सागर पारठे, दिगंबर पारठे व ऋषी पारठे यांनी वाघ्या व मुरळ्यांच्या वेशात सुंदर नृत्य सादर केले. तर किरण साळेकर यांनी ढोलकी-मृदुंग वादन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. यावेळी ओमकार पारठे व श्रीकांत (आबा) पारठे यांनीही साथीदार म्हणून सहभाग घेतला.
या पारंपारिक सादरीकरणामुळे ग्रामस्थांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमाला मंडळातील युवा कार्यकर्ते तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व सर्वांनी उत्साहाने कार्यक्रमाचा आनंद घेतला.
कार्यक्रमानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुलांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.
गावातील पारंपारिक संस्कृती जपण्यासाठी आणि ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन होत राहावे, अशी भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.










