गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरे लवकरात लवकर मिळावीत, या प्रमुख मागणीसाठी १० मार्च रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील विधानभवनासमोर आझाद मैदानावर गिरणी कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जास्तीत जास्त गिरणी कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मोहरी येथे गिरणी कामगारांची बैठक पार पडली. बैठकीत गिरणी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने उज्वला भगत यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले.

गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी ठोस आराखडा तयार करून इरादा पत्र देण्यात यावे, तसेच वंचित राहिलेल्या कामगारांना अर्ज भरण्याची पुन्हा संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच १९८१ पूर्वीच्या गिरणी कामगारांना सदनिकेच्या योजनेत सहभागी करून घ्यावे, संक्रमण शिबिरांमध्ये असलेली रिक्त घरे तातडीने गिरणी कामगारांसाठी निश्चित करावीत आणि गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
या मागण्यांसाठी येत्या १० मार्च रोजी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असून त्यासाठी विविध गावांमध्ये बैठका घेऊन कामगारांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मोहरी, तांभाड, दिडघर, निगडे, भिलारेवाडी, वेल्हे, किकवी, शिरवळ, पालशी, बलवड, मेरवणे, कापूरहोळ आदी ठिकाणी जाऊन कामगारांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
वंचित गिरणी कामगारांनी अर्जाचा फॉर्म भरून १० मार्च रोजी जमा करावा, तसेच अधिक माहितीसाठी ९८२११२६६६७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.










