तालुक्यातील मौजे भागीनघर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती तिथीनुसार अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. गावात पारंपरिक पद्धतीने झालेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. ‘विठू राया’ आणि ‘ज्ञानोबा माऊली’ यांच्या अखंड नामस्मरणाने आणि हरिनामाच्या गजराने वातावरण भारावून गेले होते. शिवरायांच्या पराक्रमाला अभिवादन करतानाच वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भक्ती आणि शक्तीचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी गावातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सरपंच दत्तात्रय पानसरे, पंढरीनाथ पानसरे, पोलीस पाटील तानाजी पानसरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश यादव, तसेच राजेंद्र पानसरे, राजेश पानसरे, संतोष यादव, संतोष पानसरे, सोनल पानसरे, राहुल पानसरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामस्थ मंडळ आणि रणझुंजार तरुण मंडळ, भागीनघर यांच्या वतीने करण्यात आले होते. गावातील तरुणांनी उत्साहाने पुढाकार घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. महिलांचा सहभागही लक्षणीय होता.
केवळ मिरवणुका किंवा औपचारिक कार्यक्रम न ठेवता, शिवरायांचे विचार आणि संतांची शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या वातावरणात ग्रामस्थ भारावून गेले होते.
कार्यक्रमाची सांगता सामूहिक आरती आणि प्रसाद वितरणाने करण्यात आली. या भक्तीमय आणि प्रेरणादायी सोहळ्याचे परिसरात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.










