छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत करंजावणे (ता. राजगड) येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विविध शासकीय सेवांचा लाभ देत एकूण ५१८ नागरिकांना विविध दाखले व सेवा प्रदान करण्यात आल्या, अशी माहिती तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
जिल्हाधिकारी तसेच भोरचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड तालुक्यातील अंबावणे सर्कलमधील गावांसाठी पार्वती मंगल कार्यालय, करंजावणे येथे हे महाराजस्व अभियान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात नागरिकांना विविध दाखले व सेवा देण्यात आल्या. त्यामध्ये डोमिसाईल दाखले ११७, ७/१२ उतारे व ८-अ ६७, फेरफार निर्गती ३८, उत्पन्न दाखले ३८, आधार कार्ड सेवा १९, ग्रामपंचायत ८-अ ७८, एच.बी. ३२, पुरवठा विभाग २३ आणि आरोग्य विभागाच्या ५२ सेवा अशा विविध प्रकारच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी विकास खरात, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, नायब तहसीलदार मयूर बनसोडे, पुरवठा अधिकारी उत्तम आगलावे, मंडल अधिकारी इंदुराव पोळ, तलाठी सारस्वत सोनवणे, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, जिल्हा परिषद सदस्य तानाजी मांगडे, अमोल नलावडे, पंचायत समिती सदस्य संदीप खुटवड, सीता खुळे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










