राजगड तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सभापतीपदी सुवर्णा राऊत तर उपसभापतीपदी संदिप खुटवड यांची निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.
राजगड तालुका पंचायत समितीच्या सभागृहात आज सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. अमिता तळेकर, तहसीलदार निवास ढाणे तसेच गटविकास अधिकारी संजय ढमाळ उपस्थित होते.
सभापती पदासाठी सुवर्णा राऊत आणि उपसभापती पदासाठी संदिप खुटवड यांचेच अर्ज दाखल झाल्याने या दोन्ही पदांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमिता तळेकर यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
निवड जाहीर होताच पंचायत समिती परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष साजरा केला.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, तानाजी मांगडे, पंचायत समिती सदस्या सीता खुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, आनंद देशमाने, माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, अंकुश दसवडकर, रमेश शिंदे, संतोष रेणुसे, प्रमोद लोहकरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सभापती सुवर्णा राऊत व उपसभापती संदिप खुटवड यांनी राजगड तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.










