नसरापूर, ता. भोर : महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महाराजस्व अभियान अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय भोर व तहसिल कार्यालय भोर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर मंडळ भाग – नसरापूर, ता. भोर, जि. पुणे येथे आयोजित करण्यात येणार असून, शेतकरी व नागरिकांच्या महसूल संबंधित विविध प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.
हे शिबिर शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जानकीराम मंगल कार्यालय, नसरापूर (ता. भोर, जि. पुणे) येथे होणार आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाकडील विविध सेवा व योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७/१२ उताऱ्यातील चुकांची दुरुस्ती करणे, डिजिटल ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप करणे, तुकडेबंदी नियमितीकरण करणे, वर्ग २ जमिनींची वर्ग १ मध्ये रूपांतरणाची प्रकरणे, भूसंपादन व अकृषिक कमी-जास्त पत्रक तयार करणे तसेच अकृषिक तरतुदीनुसार अधिमूल्य वसुली आदी कामे करण्यात येणार आहेत.
तसेच लोकसेवा हक्क कायद्यानुसार जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवास/अधिवास प्रमाणपत्र यांसारख्या सेवाही नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी योजना यांसारख्या सामाजिक लाभाच्या योजनांची माहिती व लाभ देण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार आहे.
याचबरोबर एक खिडकी योजनेअंतर्गत ई-मोजणी, अॅग्रीस्टॅक, पीएम किसान योजना तसेच तक्रार निवारण यांसारख्या सेवा नागरिकांना एका ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नसरापूर परिसरातील सर्व शेतकरी, खातेदार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या महसूल व शासकीय योजनांशी संबंधित कामांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन तहसिलदार राजेंद्र नजन व उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी केले आहे.










