शिवभक्त परिवार इंदापूर आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून हर्षवर्धन पाटील (राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री) उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचाच राज्याभिषेक होणार, हा दृढ संकल्प मनाशी बाळगून हिंदवी स्वराज्य स्थापनेचा पाया घातला. जिजाऊंचा इतिहास थोडा जरी वाचला तरी मनात धैर्य निर्माण होते. स्त्रीशक्ती किती प्रभावी नेतृत्व करू शकते, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ.”
या वेळी श्रीमंतराजे लखोजीराव जाधवराव यांचे थेट १६ वे वंशज श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव तसेच इंदौरच्या होळकर घराण्याचे थेट १३ वे वंशज श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात वीरपत्नी सौ. गौरी अशोक इंगवले यांना मान्यवरांच्या हस्ते यावर्षीचा जिजाऊ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व आजी-माजी सैनिक, एस.पी.आर.एफ. व सी.आर.पी.एफ. यांच्या माता व पत्नी यांचे शिवभक्त परिवार इंदापूर यांच्या वतीने जिजाऊ पूजन करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, “महिला व मुलींनी आयुष्यात संघर्षाचे क्षण आले, संकटे आली तर राष्ट्रमाता जिजाऊंची आठवण ठेवावी. राजमाता जिजाऊ यांनी आपल्या ७६ वर्षांच्या आयुष्यात संस्कारांची शिदोरी दिली. तर स्वामी विवेकानंद हे युवकांचे आदर्श असून त्यांनी संपूर्ण जगात तत्त्वज्ञान, हिंदुत्व आणि समाजप्रबोधनाचे कार्य केले.”
श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव म्हणाले, “प्रत्येकाला आपल्या घरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावेत असे वाटते; पण त्याआधी प्रत्येक घरी प्रथम राजमाता जिजाऊ जन्माला यायला हव्यात.”
तर श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर म्हणाले, “महापुरुषांच्या त्याग, बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात लोकशाही पद्धतीने जगत आहोत. राष्ट्र प्रथम हा विचार समोर ठेवून त्यांच्या विचारधारेचे आत्मसात करणे गरजेचे आहे.”
कामधेनू सेवा परिवारचे संस्थापक अध्यक्ष व समाजभूषण शिवव्याख्याते डॉ. लक्ष्मणराव आसबे यांनी राजमाता जिजाऊंच्या संघर्षाचे व स्वामी विवेकानंद यांच्या युवकप्रेरक कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे, वीरपत्नी हेमलता बाबुराव साबळे, उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे, डॉ. शिवाजी वीर, नगरसेवक अनिल पवार, माजी नगरसेवक कैलास कदम, दत्तात्रेय अनपट आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फलफले सर व नितीन भोसले यांनी केले, तर आभार बापू जामदार यांनी मानले.










