आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

राजगडाच्या मावळा तिर्थावर ४२८ वा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव; जनसागरातून मानवंदना


 

राजगड : जगातील पहिल्या स्वातंत्र्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांच्या ४२८ व्या ऐतिहासिक जन्मोत्सवानिमित्त सोमवारी (दि.१२) राजगड पायथ्याच्या पाल बुद्रुक येथील मावळा तिर्थावर अभूतपूर्व उत्साहात मानवंदना सोहळा पार पडला. राजगड परिसर ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.

राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषासह पारंपरिक तुतारी, ढोल-ताशांचा गजर, शाहिरी पोवाडे, व्याख्याने आणि पालखी सोहळ्यामुळे राजगडाची दरी-खोरी भारावून गेली. महिला, जिजाऊभक्त, विविध खात्यांचे अधिकारी, राजकीय पदाधिकारी तसेच पुणे–राजगड–तोरणा–सिंहगड परिसरासह राज्यभरातील शेकडो शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मावळा जवान संघटना व अठरापगड मावळ्यांच्या वतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूच्या अर्धाकृती शिल्पाचे अनावरण ज्येष्ठ शिवभक्त राजेंद्र बांदल यांच्या हस्ते झाले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणुमंत धुमाळ, राजगड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ आणि वेल्हे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते स्मारकाची पारंपरिक पूजाअर्चा करण्यात आली.

जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज सुरेश मोहिते, सरनौबत येसाजी कंक यांचे वंशज संजय कंक, शुरवीर गोविंद गोपाळ गायकवाड यांचे वंशज जयेश गायकवाड, सरदार बकाजी फर्जंद यांचे वंशज सचिन भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण राऊत, शंकरराव भुरुक, तानाजी मांगडे, आप्पासाहेब आखाडे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ, वनिता गोरड, बाळासाहेब भरम, गंगाराम शिर्के, वेल्हे पोलीस ठाण्याचे अंमलदार आकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी संघटनेच्या वतीने ४१ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या परंपरेची माहिती दिली. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिध्देश्वर शंभु महादेवाच्या प्रांगणात रयतेचे न्यायनिवाडे केले, त्या पवित्र स्थळाला ‘जिवंत वारसा’ असल्याचे त्यांनी नमूद केले. शिव व्याख्याते प्रा. दादासाहेब कोरेकर व ओंकार यादव यांच्या व्याख्यानांनी शिवकाळ जागा झाला. रायरेश्वराचे शिवाचार्य सुनिल स्वामी जंगम यांच्या शिव-जिजाऊ वंदनेने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांनी गौरविण्यात आले. न्हावरे (ता. शिरूर) येथील पद्मावती कोरेकर यांना राष्ट्रीय राजमाता गौरव पुरस्कार, धायरी येथील पंढरीनाथ पोकळे यांना राष्ट्रीय मावळा भूषण पुरस्कार, भोर येथील रमेश बुदगुडे यांना छत्रपती शिवाजी महाराज समाजरत्न पुरस्कार, दासवे येथील विष्णु मोरे यांना छत्रपती संभाजी महाराज गौरव पुरस्कार व पौड येथील विनायक गुजर यांना छत्रपती राजाराम महाराज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच राष्ट्रीय खेळाडू पुरस्कार, आदर्श ग्राम विकास अधिकारी, आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक पुरस्कारानेही मान्यवरांचा सन्मान झाला.

प्रास्ताविक संघटनेचे कार्यवाह रोहित नलावडे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप खाटपे, संजय भिंताडे, तानाजी मरगळे व संतोष वरपे यांनी केले. संयोजन संघटनेचे संघटक संतोष चोरघे, हनुमंत दिघे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दारवटकर, शहराध्यक्ष पप्पु गुजर, लक्ष्मण करंजकर, संदीप मालुसरे, गोरख लायगुडे आदींनी केले.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!