आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर विधानसभा मतदारसंघात ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम २०२६’ला प्रारंभ; एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही, दुबार व स्थलांतरित नावांवर प्रशासनाची करडी नजर


उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांचे मार्गदर्शन; तहसीलदार राजेंद्र नजन यांचा इशारा – फॉर्म न भरल्यास स्थलांतरित व दुबार मतदारांची नावे वगळली जाणार

 

नसरापूर प्रतिनिधी :

 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने राज्यभर ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम २०२६’ सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत भोर विधानसभा मतदारसंघासाठी अभिजीत मंगल कार्यालय, भोर येथे विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर सूचना देण्यात आल्या.

 

या प्रशिक्षण कार्यक्रमास मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, १६ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, २४० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) तसेच २५ पर्यवेक्षक उपस्थित होते. मतदार यादीतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि अपात्र नावे वगळली जावीत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

 

‘एक मतदार – एकच मतदान’ या तत्त्वावर प्रशासनाचा भर

 

बैठकीत मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगितले की, मतदार यादीत एकही पात्र नागरिक वंचित राहणार नाही आणि एकही नाव दुबार राहणार नाही, यासाठी संपूर्ण यंत्रणा काटेकोरपणे काम करणार आहे. मयत व्यक्ती, कायमस्वरूपी स्थलांतरित नागरिक तसेच दुबार नोंद असलेल्या मतदारांची पडताळणी करून नियमानुसार नमुना क्रमांक ७ द्वारे त्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामुळे मतदार यादी अधिक अचूक व शुद्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

३० जूनपासून घरोघरी जाऊन बीएलओ करणार फॉर्मचे वाटप

 

या विशेष मोहिमेअंतर्गत ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते ENUMERATION FORM च्या दोन प्रती प्रत्येक कुटुंबाला देणार असून त्या फॉर्ममध्ये मतदारांनी आवश्यक माहिती अचूकपणे भरून पुन्हा बीएलओकडे जमा करणे बंधनकारक राहणार आहे.

 

प्रत्येक मतदाराने सन २००२ व सन २०२६ च्या मतदार यादीतील आपली संपूर्ण माहिती तपासून आवश्यक दुरुस्तींसह फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे फॉर्म भरणे सर्व मतदारांसाठी अनिवार्य असून परगावी नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी गेलेल्या तसेच स्थलांतरित मतदारांनीही आपल्या मूळ भागातील बीएलओकडून फॉर्म घेऊन भरावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

 

राजकीय पक्षांनी बीएलए नेमून जनजागृती करावी

 

मतदार पुनरिक्षण कार्यक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर Booth Level Agent (BLA) नियुक्त करावेत आणि मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. विकास खरात यांनी केले.

 

बीएलओंना डिजिटल प्रणालीचे विशेष प्रशिक्षण

 

या बैठकीत उपस्थित बीएलओंना मास्टर ट्रेनर यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या नव्या डिजिटल प्रणाली, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, मोबाईल ॲपचा वापर आणि नवीन तांत्रिक सुविधांबाबत सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रशिक्षणानंतर उपस्थित अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

 

भोर विधानसभा मतदारसंघात १ लाख ६७ हजारांहून अधिक मतदार

 

यावेळी तहसीलदार राजेंद्र नजन यांनी भोर विधानसभा मतदारसंघातील मतदारसंख्येची माहिती देताना सांगितले की, मतदारसंघात एकूण १ लाख ६७ हजार ८२२ मतदार आहेत. यापैकी मागील निवडणुकीत जवळपास १ लाख ३३ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर ३४ हजारांहून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहिले होते. या वंचित मतदारांमध्ये मयत, दुबार नावे असलेले तसेच स्थलांतरित नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

फॉर्म न भरल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाणार

 

तहसीलदार राजेंद्र नजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या विशेष मोहिमेत ज्या ठिकाणी मतदाराला आपले मतदानाचे नाव कायम ठेवायचे आहे, त्या ठिकाणच्या बीएलओकडे फॉर्म भरून देणे अनिवार्य आहे. जर संबंधित मतदाराने फॉर्म भरला नाही किंवा आवश्यक माहिती सादर केली नाही, तर पडताळणीनंतर स्थलांतरित व दुबार मतदारांची नावे मतदार यादीतून पूर्णपणे वगळण्यात येतील.

 

प्रशासनाच्या या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेमुळे भोर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अधिक अचूक, विश्वासार्ह आणि त्रुटीरहित होणार असून, प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा घटनात्मक अधिकार बजावण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन बीएलओकडून मिळणारे फॉर्म वेळेत भरून जमा करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


  • 👍

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

108
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

राजगड पोलीस ठाण्यात नवे पीआय संतोष जाधव अॅक्शन मोडमध्ये; अवैध धंदे, गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका भाडेकरू पडताळणी, कामगार व्हेरिफिकेशन, व्यसनमुक्ती, सायबर जनजागृती आणि सीसीटीव्ही यंत्रणेवर विशेष भर; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

error: Content is protected !!