नसरापूरहून राजगड तालुक्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील शिवगंगा नदीच्या पुलावर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पुलाला पूर्णपणे तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालक, दुचाकीस्वार व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती आहे की नसरापूर-राजगड रोडवर कोठे कोठे पाणी जमते, किती खड्डे आहेत आणि कोणत्या ठिकाणी समस्या निर्माण होतात. याची त्यांनी पूर्ण पाहणी केलेली असते. मात्र कित्येक वर्षांपासून हे असंच चाललं असून फक्त ढकलायचं म्हणून काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, दरवर्षी नसरापूर, माळेगाव आणि परिसरातील स्थानिक नागरिक एकत्र येऊन शिवगंगा नदीवरील पुलाची साफसफाई करतात. कारण त्यांना या मार्गावरून रोज ये-जा करावी लागते. पुलावर साचलेला गाळ, कचरा आणि अडथळे काढण्याचे काम नागरिक स्वतः करत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र केवळ पाहणीपुरताच मर्यादित असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी सरकारी गाडीत येतो आणि सरकारी गाडीत जातो. त्यामुळे त्याच्या पायाला पाणी, चिखल किंवा माती लागणार नाही. पण सामान्य नागरिकांना मात्र रोज या पाण्यातून आणि खड्ड्यांतून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे प्रत्यक्ष त्रास काय असतो याची जाणीव संबंधित अधिकाऱ्यांना नसल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
राजगड तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ नावालाच असून प्रत्यक्षात कामकाज शून्य असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे. तसेच आमदार असतील, खासदार असतील, कलेक्टर असतील किंवा इतर प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले दिसत नाही, अशीही नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.
पहिल्याच पावसात पुलाची ही अवस्था झाली असल्याने आगामी काळात आणखी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, शिवगंगा नदीवरील पुलावरील पाणी तुंबण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांचा ढिसाळ कारभार लक्षात घेऊन त्यांची चौकशी करण्यात यावी, तसेच या ठिकाणाहून तडकाफडकी बदली करून काम करणारे अधिकारी आणावेत, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.









