नसरापूर : नसरापूरहून राजगड तालुक्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील शिवगंगा नदीच्या पुलावर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पुलाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आल्याची बातमी आय एम न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची हालचाल सुरू झाली. मात्र, त्यानंतर समोर आलेले चित्र विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे.
शिवगंगा नदीवरील हा पूल नसरापूर आणि राजगड तालुक्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. दरवर्षी पावसाळ्यात या पुलावर पाणी तुंबते, ही बाब स्थानिक नागरिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागालाही चांगलीच माहिती आहे. तरीही पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या होलची साफसफाई, गाळ काढणे, नाले मोकळे करणे किंवा आवश्यक देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
यंदाही पहिल्याच पावसात पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. याबाबत आय एम न्यूजने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने एका कर्मचाऱ्याला घटनास्थळी पाठवले. मात्र, त्या कर्मचाऱ्याकडे फावडा, टिकाव, कुदळ किंवा गाळ काढण्यासाठी लागणारी कोणतीही साधनसामग्री नव्हती.
संबंधित कर्मचारी केवळ एका काठीच्या सहाय्याने आणि स्वतःच्या हाताने पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेले होल साफ करताना दिसून आला. हे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. “ज्या विभागाकडे कोट्यवधी रुपयांची कामे असतात, त्या विभागाकडे एका कर्मचाऱ्याला साधा फावडादेखील देता येत नाही का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, एवढ्या गंभीर समस्येच्या ठिकाणी विभागाने केवळ एकाच कर्मचाऱ्याला पाठविल्याने नाराजी आणखी वाढली आहे. अनेकांच्या मते, ही समस्या तात्पुरती सोडविण्याचा केवळ दिखावा करण्यात आला असून मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, दरवर्षी याच पुलावर पाणी तुंबते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्ध पद्धतीने साफसफाई आणि देखभाल होणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात कामे न झाल्याने पहिल्याच पावसात पुलावर पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
“सार्वजनिक बांधकाम विभागाला काठीचा सहारा” अशी उपरोधिक प्रतिक्रिया आता परिसरात ऐकायला मिळत आहे. एका कर्मचाऱ्याला कोणत्याही साधनसामग्रीशिवाय पाठवून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, शिवगंगा नदीवरील पुलावरील पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या सर्व मार्गांची नियमित साफसफाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.









