पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका परिसरात राजगड पोलिसांनी वाहतूक नियमनादरम्यान मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणाऱ्या एका चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. या कारवाईमुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षिततेबाबत पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजल्यापासून पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल गणेश पंढरीनाथ साळुंके हे खेड शिवापूर टोलनाका येथे पुणे–सातारा महामार्गावर वाहतूक नियमनाचे काम करीत होते. त्यांच्यासमवेत पोलीस हवालदार गायकवाड तसेच महामार्ग पोलीस मदत केंद्र, सारोळा येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सायंकाळी सुमारे 6.55 वाजण्याच्या सुमारास साताराच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये एक दुचाकी चालक संशयास्पदरीत्या झिगझॅग पद्धतीने वाहन चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव विजय दत्तात्रय काकडे (वय 41 वर्षे), रा. धनबुंत कुरणवस्ती, ता. बारामती, जि. पुणे असे सांगितले.
चौकशीदरम्यान चालकाच्या तोंडातून मद्याचा तीव्र वास येत असल्याने पोलिसांनी त्याची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली. या तपासणीत त्याच्या शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण 184.3 एमजी प्रति 100 मिली रक्त इतके आढळून आले. हे प्रमाण कायद्याने निर्धारित मर्यादेपेक्षा अनेक पटीने जास्त असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
सदर व्यक्ती आपल्या ताब्यातील एमएच-42-एफवाय-9688 क्रमांकाची दुचाकी मद्यप्राशन करून सार्वजनिक रस्त्यावर चालवत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 275/2026 दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. महामार्गावर स्वतःच्या तसेच इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मद्यपान करून वाहन चालवू नये, असे आवाहनही राजगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.









