तांभाड, ता. — छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तांभाड येथे शिव गणेश प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
उत्सवाची सुरुवात ऐतिहासिक किल्ले रायरेश्वर येथून शिवजोत प्रस्थान करून करण्यात आली. शिवभक्तांच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. सायंकाळी गावातून भव्य शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशे, लेझीम पथके तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवक-युवतींमुळे मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. उपस्थित शिवभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ‘रणपती शिवराज – आग्रा स्वारी’ हा ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात आला.
या उत्सवामुळे तरुण पिढीमध्ये शिवचरित्राबद्दल प्रेरणा निर्माण होत असून सामाजिक एकात्मतेचा संदेशही देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिव गणेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.










