राजगड तालुक्यातील गुंजन मावळ खोऱ्यातील हातवे बुद्रुक येथे *‘जाणता राजा युवा प्रतिष्ठान’*च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदाही पारंपरिक उत्साह, ऐतिहासिक दिमाख आणि सांस्कृतिक वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. पारंपरिक मिरवणूक, शस्त्रकलेची प्रात्यक्षिके आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण गाव शिवमय झाले होते.
सोहळ्यानिमित्त ‘जाणता राजा चौक’ येथे आकर्षक फुलांची आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सजवलेल्या बैलगाडीतून शिवरायांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझिमच्या तालावर नृत्य करणारे युवक-युवती आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते ‘गनिमी कावा’ मर्दानी शस्त्रकला पथकाने सादर केलेले थरारक प्रात्यक्षिक. तलवारबाजी, लाठी-काठी व विविध पारंपरिक युद्धकौशल्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. शिवकालीन पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या या सादरीकरणाला प्रेक्षकांनी जोरदार दाद दिली. तसेच लहान मुला-मुलींनी सादर केलेली पारंपरिक नृत्ये, कविता वाचन व भाषणांमुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष रंगत आली.

कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषद सदस्य विक्रमदादा खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्या व विद्यमान पंचायत समिती सदस्या तृप्तीताई खुटवड, पंचायत समिती सदस्य विशाल कोंडे, गुंजवणी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जगन्नाथदादा जामदार, ग्रामसेवक युनियनचे माजी अध्यक्ष मदन आबा शेलार, माजी सभापती लाहूनाना शेलार, शिवसेना नेते सचिन बांदल, सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष गणेश खुटवड, तंटामुक्ती अध्यक्ष व जननीमाता सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष संजय भिलारे, सरपंच सुवर्णा पालखे, माजी सरपंच संजय भिलारे, माजी उपसरपंच निलेश थिटे, राहुल मादगुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या २१ वर्षांची परंपरा जपत नव्या पिढीने अत्यंत सक्षमपणे सोहळ्याची धुरा सांभाळल्याचे यावेळी दिसून आले. शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन अध्यक्ष संतोष चिकणे, अमोल घोडके, सुजित अहिरे, सुभाष खुटवड, संदीप मादगुडे, राजेंद्र जगदाळे, संग्राम मादगुडे, राजू चिकणे, लालू सोंडकर, प्रतीक थिटे तसेच प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश अहिरे व पूनम सुजित अहिरे यांनी केले.










