विंझर (ता. राजगड-वेल्हे) येथे भारतीय बौद्ध महासभा (पुरुष व महिला विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सिद्धार्थ बुद्ध विहार व सिद्धार्थ प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या या सोहळ्याला तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विंझर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सदाशिव (अण्णा) गायकवाड होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सम्राट अशोकांच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेचा आणि सामाजिक योगदानाचा उल्लेख करत, आजच्या काळात त्यांच्या विचारांची गरज अधोरेखित केली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण पुणे जिल्हा पूर्व महिला विभागाच्या अध्यक्षा सुजाताताई ओव्हाळ यांचे ‘न उलगडलेले चक्रवर्ती सम्राट अशोक’ या विषयावरील प्रबोधनपर व्याख्यान ठरले. त्यांनी सम्राट अशोकांनी युद्धाचा त्याग करून धम्माचा स्वीकार कसा केला, तसेच जागतिक शांततेसाठी दिलेला संदेश आजही किती महत्त्वाचा आहे, याचे प्रभावी विवेचन केले.
या कार्यक्रमास राजगड-वेल्हे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘नमो बुद्धाय’ आणि ‘सम्राट अशोकांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सिद्धार्थ प्रतिष्ठान विंझर यांच्या सहकार्यामुळे सोहळा शिस्तबद्ध व भव्य झाला.










