आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

वेल्हे वनपरिक्षेत्रात वन्यजीव शिकारीवर मोठी कारवाई तीन आरोपी ताब्यात; भेकराचे मांस व हत्यारे जप्त – अवैध शस्त्रांवर कारवाईची मागणी


पुणे जिल्ह्यातील राजगड (वेल्हे) तालुक्यात वन्यजीव शिकारीच्या वाढत्या घटनांमध्ये वनविभागाने मोठी कारवाई करत तीन शिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दिनांक 29 मार्च 2026 रोजी मौजे रांजनेफाटा येथे करण्यात आली असून, या प्रकरणामुळे परिसरात पुन्हा एकदा वन्यजीव संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

 

वनपरिमंडळ आंबेगाव व वनपरिक्षेत्र वेल्हे अंतर्गत गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने सापळा रचला. माहिती अशी होती की काही शिकारी रिक्षा (क्र. MH12VW6394) मधून शिकारीसाठी येणार आहेत. त्यानुसार पथकाने योग्य वेळी कारवाई करत मौजे कोंडगाव येथील मारुती बबन दारवडकर तसेच मौजे निगडे मोसे येथील दत्तात्रय लक्ष्मण नलावडे व गोरख हनुमंत नलावडे या तिघांना रंगेहाथ पकडले.

 

कारवाईदरम्यान आरोपींकडून वन्यजीव भेकर (पिसोरी) या प्राण्याचे मांस तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात आली. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 2(1), 9, 48(ए), 39, 50, 51 तसेच भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा (गु.क्र. WL-07/2026) दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

 

वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांनी सांगितले की, वन्यजीवांची शिकार हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा असून अशा प्रकारासाठी कमाल 7 वर्षे कारावास व 25 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. वन्यजीव संरक्षणासाठी विभाग कटिबद्ध असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

 

ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिमंडळ अधिकारी व विविध वनरक्षकांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम यशस्वी केली.

 

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राजगड तालुक्यात यापूर्वीही भेकराच्या शिकारीच्या घटना घडल्याचे समोर आले असून वेल्हे परिसर हा दुर्गम व जंगलयुक्त भाग असल्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

 

स्थानिक नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया :

“आज वन्यजीवांची शिकार केली जात आहे, परंतु उद्या हीच अवैध शस्त्रे मानवांसाठीही धोका निर्माण करू शकतात. वेल्हे परिसरात नेमके किती लोकांकडे अवैध शस्त्रे आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

कारवाईची मागणी वाढली :

 

वेल्हे तालुक्यातील अवैध शस्त्रधारकांचा शोध घ्यावा

 

संशयितांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी

 

दुर्गम भागात संयुक्त गस्त वाढवावी

 

वन्यजीव संरक्षणासाठी विशेष मोहीम राबवावी

 

 

वनविभागाची अलीकडील कारवाई कौतुकास्पद असली, तरी या घटनांवर कायमस्वरूपी आळा बसवण्यासाठी पोलीस प्रशासन व वन विभागाने समन्वय साधून सातत्यपूर्ण आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 

वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता या गंभीर विषयावर प्रशासनाने संवेदनशीलतेने लक्ष देऊन ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!