भिगवण वार्ताहर: सागर जगदाळे
भिगवण गणातून नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्या हेमा माडगे यांनी आपल्या विजयाचे श्रेय दिवंगत अजित पवार यांना अर्पण केले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठान क्रीडांगणावर उभारलेल्या अंत्यसंस्कार स्थळी भेट देत त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपल्या ऐतिहासिक विजयाला त्यांना समर्पित केले.
निवडणुकीतील यशानंतर माडगे यांनी प्रथम बारामती येथे जाऊन श्रद्धांजली वाहणे ही आपल्या राजकीय संस्कारांची आणि कृतज्ञतेची भावना असल्याचे सांगितले. “अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणात तसेच विकासकामांत मोठे योगदान दिले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच आम्ही पुढील काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करू,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भिगवण येथील युवा नेते अजिंक्य माडगे हेही उपस्थित होते. त्यांनीही दिवंगत नेत्याला आदरांजली अर्पण करत हेमा माडगे यांच्या विजयाबद्दल समाधान व्यक्त केले. “हा विजय केवळ व्यक्तीचा नसून विचारांचा आहे. अजितदादांच्या विकासाभिमुख धोरणांचा वारसा पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे,” असे अजिंक्य माडगे यांनी सांगितले.
भिगवण गणातील मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हेमा माडगे यांनी पंचायत समिती सदस्य म्हणून पारदर्शक व जनहिताच्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या कृतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले असून, विजयाचे श्रेय आपल्या मार्गदर्शक नेत्याला अर्पण केल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.










