वीर : दरवर्षीप्रमाणे यंदाही वीरची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत असून देवाच्या लग्न सोहळ्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे. भोर व राजगड तालुक्यातील अनेक गावांमधून बैलगाड्या सजवून वीरकडे रवाना होत आहेत. यामध्ये माळेगाव येथील मोरे कुटुंबीयांची आकर्षक बैलगाडी यंदा विशेष चर्चेचा विषय ठरली.
गाडीचे मालक. संदीप भाऊ मोरे व निखिल सोंडकर यांच्या शंभू आणि नाथा या बैलजोडीची सजावट पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. रोडवरून गाडी जात असताना अनेकांनी सेल्फी काढत या अनोख्या कलाकृतीचे कौतुक केले.
एका रात्रीत साकारलेली कलाकृती
यंदा काहीतरी वेगळं करायचं ठरलं होतं; मात्र नेमकी संकल्पना स्पष्ट नव्हती. दरम्यान, संजय मोरे व युवराज मोरे यांनी दिलेल्या कल्पनेवरून कामाला सुरुवात झाली. विश्वकर्मा फॅब्रिकेशनचे मालक किरण सुतार व देवा सुतार या दोघा भावांनी एका रात्रीत बैलगाडीची रचना पूर्ण केली. वेळ अत्यंत कमी असतानाही गावातील कार्यकर्त्यांनी रात्रभर जागून गाडी रंगवून सजवली.
नाथ साहेबांच्या कृपेने कोणतीही अडचण न येता गाडी पहाटेच वीरकडे रवाना झाली. गावातील इतर गाड्या आधीच सज्ज झाल्या असताना माळेगावकरांची गाडी शेवटच्या क्षणी तयार झाली; मात्र तिची भव्यता सर्वांच्या नजरा वेधून घेत होती.
लाखो भाविकांचा उत्साह
वीरच्या जत्रेला दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात. संपूर्ण परिसर गुलालाने लाल होऊन जातो. भोर व राजगड तालुक्यांतूनही मोठ्या संख्येने बैलगाड्या येतात. प्रत्येक जण आपल्या गाडीला वेगवेगळी आकर्षक सजावट करून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतो.
यात्रेदरम्यान पारंपरिक ‘मारामारी’ उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देवस्थान असलेल्या घरांतील कुटुंबीय बैलगाड्या घेऊन या सोहळ्यात सहभागी होतात.
सुतार कुटुंबीयांची परंपरा कायम
गेल्या दोन-तीन वर्षांपासून माळेगाव येथील सुतार कुटुंबीय बैलगाड्यांवर नक्षीकाम व अभिनव डिझाइन साकारत आहेत. यंदाही त्यांनी उत्कृष्ट कारागिरीचे दर्शन घडवले असून भाविकांच्या मनावर छाप पाडली आहे.
“माळेगावकरांची शान – शंभू, नाथा” अशी ओळख निर्माण झालेली ही बैलगाडी यंदाच्या वीर यात्रेचे खास आकर्षण ठरली आहे.










