राजगड : राजगड तालुक्यातील गुंजवणे गावाची मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत प्रशासनाकडून नुकतीच सविस्तर पाहणी करण्यात आली. तालुक्यातील गुणांकन टक्केवारीमध्ये गुंजवणे गाव अग्रेसर ठरत असल्याने गावातील विकासकामांचा आढावा घेऊन उर्वरित बाबी अधिक सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून स्वच्छता, शिक्षण, पायाभूत सुविधा, ग्रामव्यवस्थापन आणि लोकसहभाग या निकषांवर गावाने उल्लेखनीय प्रगती साधल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. प्रशासनाच्या पथकाने विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत ग्रामपंचायत प्रशासनाशी संवाद साधला व आवश्यक सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्या.
गावातील शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीही विशेष ठरली असून येथील शाळेतील शिक्षकांनी राज्यस्तरीय व विभागस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवत गावाचा गौरव वाढवला आहे. ग्रामसेवक संदेश यादव यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच राजगड तालुका दूध संघाचे अध्यक्ष अर्जुन भिलारे यांनी शाळेसाठी पाच हजार रुपयांची पुस्तके खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली.
या प्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तानाजी मांगडे, अमोल नलावडे, पंचायत समिती सदस्या सीता खुळे, संदीप खुटवड यांचा गाव व शाळेच्या वतीने समाजसुधारकांची वाचनीय पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले.
यावेळी आनंद बांदल, विस्तार अधिकारी शकील मुल्ला, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, मुख्याध्यापक हेमंत कांबळे, सरपंच गुलाब रसाळ, पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










