♦नसरापूर, : भोर तालुक्यात महाबीजमार्फत कृषी विभागाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या परभणी शक्ती या ज्वारी बियाण्यांबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून अनेक गावांतील शेतकऱ्यांचे पीक अपेक्षित वाढ न झाल्याने धोक्यात आले आहे. ज्वारीची उगवण सुरुवातीला चांगली दिसून आली असली तरी पुढील वाढ पूर्णपणे खुंटल्याने रब्बी हंगाम वाया जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. परिणामी उत्पादनासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
भोर तालुक्यातील सुमारे २४ गावांमधील शेतकरी गटांना महाबीजकडून एकरी चार किलो प्रमाणात ज्वारी बियाणे देण्यात आले होते. कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार वेळेत मशागत करून पेरणी करण्यात आली. सुरुवातीला उगवण समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र दोन ते अडीच महिने उलटूनही ज्वारीची वाढ अपेक्षित वेगाने झाली नाही. अनेक ठिकाणी पीक दोन ते अडीच फुटांवरच थांबल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुहेरी नुकसान : धान्यही नाही, कडबाही नाही
परभणी शक्ती हे बायोफोर्टिफाईड वाण असून एकरी १५ ते २० क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता असल्याचे सांगितले जाते. मात्र यंदा पिकाची वाढच न झाल्याने धान्य उत्पादनाचा प्रश्न तर निर्माण झालाच, शिवाय गुरांसाठी आवश्यक असलेला कडबा देखील मिळणार नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. भोर व राजगड परिसरात पशुपालन मोठ्या प्रमाणावर असल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ज्वारीचा हमीभाव प्रतिक्विंटल ३ हजार ७४९ रुपये असून अपेक्षित उत्पादन आणि कडब्याचा विचार करता शेतकऱ्यांचे एकरी सुमारे २८ हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या गावांमध्ये सर्वाधिक फटका
चिखलगाव, वेनवडी, ससेवाडी, कुरंगवडी, सांगवी बु., पांडे, राजापूर, सारोळा, वडगावडाळ, कर्णावड, कारी, वागजवाडी, केंजळ तसेच परिसरातील इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकाची वाढ न झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही ठिकाणी संपूर्ण शेतातील ज्वारी खुंटल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी दिल्या आहेत.
शेतकऱ्यांचा संताप वाढला
कुरंगवडी येथील श्री म्हातोबा कृषी बचत गटाचे शेतकरी दिनेश शिळीमकर यांनी सांगितले की, कृषी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व प्रक्रिया करून पेरणी केली होती. खत व्यवस्थापन आणि मशागत योग्य प्रकारे केली असतानाही पिकाची वाढ झाली नाही. त्यामुळे ज्वारी उत्पादनाबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.
माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनीही या प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा शेतकऱ्यांसमवेत आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
महाबीजचे स्पष्टीकरण
महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक पुरुषोत्तम फाटे यांनी सांगितले की, आलेल्या तक्रारीनंतर संबंधित शेतांची पाहणी करण्यात आली आहे. यावर्षी पावसाचा कालावधी अधिक राहिल्याने उशिरा पेरणी झाली तसेच खोडकिडी व मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निरीक्षणात आढळले आहे. प्राथमिक तपासणीत बियाण्यात दोष आढळलेला नसला तरी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली असून नुकसानीचा सविस्तर अहवाल अकोले येथील मुख्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
कृषी विभागाची भूमिका
तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी सांगितले की, काही गावांमध्ये ज्वारीची वाढ कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. हवामानातील बदल, जास्त काळ राहिलेला पाऊस आणि त्यानंतर झालेला किडींचा प्रादुर्भाव यामुळे पिकावर परिणाम झाला आहे. महाबीजला याबाबत कळवण्यात आले असून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत पुढील प्रक्रिया सुरू आहे.
पंचनामा व मदतीची मागणी
दरम्यान, रब्बी हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने संयुक्त पंचनामे करून शासनाने विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा तालुकास्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकरी संघटनांनी दिला आहे.
भोर तालुक्यातील या घटनेमुळे बियाण्यांच्या गुणवत्ता तपासणीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून कृषी यंत्रणेसमोर शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.










