आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

नसरापूरमध्ये मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन


नसरापूर प्रतिनिधी विलास धोंगडे

नसरापूर, दि. २२ नोव्हेंबर – आधुनिक युगात डिजिटल ज्ञान ही काळाची गरज बनत चालली असताना ग्रामीण विद्यार्थ्यांनाही तितक्याच सक्षमतेने संगणक शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने श्री. भगवती सेवा आश्रम व जीवन कौशल्य विकास, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने नसरापूर येथील ज्ञान प्रकाश शिक्षण संस्था परिसरात मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन करण्यात आले.

 

उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे श्री. अशोकजी नवाल यांच्या हस्ते कृष्णाजी हरी कार्येकर प्राथमिक शाळेत फित कापून केंद्राचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीतातून कार्यक्रमाला भावपूर्ण सुरुवात झाली. प्राथमिक विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांचा सहभाग आणि संस्थेचा उपक्रमाबद्दलचा विश्वास जाणवत होता.

यानंतर विजय मुकुंद आठवले माध्यमिक शाळेत संगणक प्रशिक्षण केंद्राच्या विस्तारित विभागाचे उद्घाटन संपन्न झाले. या केंद्रामुळे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना उन्नत संगणक प्रशिक्षण मिळणार असून, संगणक संचालन, टायपिंग, बेसिक सॉफ्टवेअर प्रशिक्षण तसेच भविष्यात उच्चस्तरीय कौशल्य प्रशिक्षण देण्याची संस्थेची योजना असल्याची माहिती देण्यात आली.

 

उद्घाटन प्रसंगी ज्ञान प्रकाश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शाम दलाल व डॉ. पुष्कर दलाल यांनी मान्यवर पाहुण्यांचा शिवराय-तुकोबा स्मृतीफलक देऊन सन्मान केला. या उपक्रमामागील उद्दिष्ट, भविष्यातील योजना व विद्यार्थ्यांवरील सकारात्मक परिणाम याबाबत त्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची समसमान संधी देणे ही काळाची मागणी असून, हे केंद्र त्या दिशेने भक्कम पाऊल टाकणारे आहे.”

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गिरीधर भाई राठी यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. श्याम कुलकर्णी यांनी करून दिला. या उपक्रमासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या नंदकिशोर काबरा, श्रीकांत चिटणिस, गिरीधर राठी, प्रकाश बोकील, डॉ. श्याम कुलकर्णी, चंद्रकांत जाधव, उल्हास चित्रे, मालूजी यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

 

शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शिक्षण संस्थेचे पदाधिकारी तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि पालकांचा विश्वास यामुळे हा उपक्रम निश्चितच यशस्वीपणे राबवला जाईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

 

या संगणक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून नसरापूर परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल प्रशिक्षण, नवीन रोजगार संधी, तसेच भविष्यातील करिअर घडवण्याचे मार्ग खुला होतील, असे मान्यवरांनी बोलें. गावात तंत्रज्ञानाच्या नवीन युगाची पायाभरणी झाल्याची भावना उपस्थित सर्वांनी व्यक्त केली.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!