दि. ११ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने वेल्हे तालुक्यातील वेल्हे मंडळाचा क्षेत्र पाणी दौरा जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी पुणे संजय काचोळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या दौऱ्यात अडवली येथील प्रगतशील शेतकरी मोहन दिवाजी काटकर यांच्या नाविन्यपूर्ण टरबूज प्लॉटला भेट देऊन शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची पाहणी करण्यात आली.
यावेळी काचोळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत विविध पिकांबाबत मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाच्या महाडीबीटी, पीएम किसान तसेच ‘महाविस्तार AI’ या उपयुक्त योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. भात लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान, पिकांचे व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील विक्री व्यवस्थापन याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
क्षेत्र पाहणी दरम्यान राष्ट्रीय पोषण अभियान सन २०२५-२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ज्वारी प्रकल्पालाही भेट देण्यात आली. या प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांना माहिती देत पोषणमूल्यपूर्ण पिकांचे उत्पादन वाढविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच महाडीबीटी योजनेअंतर्गत लाभार्थी शंकर दिनकर इंगुळकर यांच्या ट्रॅक्टर व रोटाविटर या कृषी अवजारांचीही पाहणी करण्यात आली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी राजगड सुनील इडोळे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार AI’ या अॅपचा वापर करून पिकांवरील कीड व रोग याबाबत तात्काळ मार्गदर्शन मिळवावे, असे आवाहन केले. तसेच रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून दर्जेदार व सुरक्षित उत्पादन घेण्यावर भर द्यावा, त्यामुळे बाजारपेठेत चांगला दर मिळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
या क्षेत्र पाणी दौऱ्यावेळी मंडळ कृषी अधिकारी वेल्हे प्रशांत भोसले, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन निगडे, महेश जगताप, रमेश बेलेकर, किरणकुमार इंगळे तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(विशाल शिंदे – आयएम न्यूज, लोकांचा आवाज)










