भोर प्रतिनिधी तबरेज खान
शिरगाव (ता.भोर) — शिरगाव हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात संबंधित ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याच्या कामासाठी सुरुंग लावल्यानंतर रस्त्यावर पडलेले दगड व धोंडे हटवणे आवश्यक असताना ते तसेच ठेवण्यात आल्याने महाड हायवेवर गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरगाव येथील जागरूक ग्रामस्थ व तरुणांनी तत्काळ पुढाकार घेतला. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ग्रामस्थांच्या सहभागातून रस्त्यावरील मोठमोठे दगड बाजूला करण्यात आले. या दरम्यान सुमारे एक तास महाड हायवेवर वाहतूक विस्कळीत झाली होती.
ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या कामात भाऊ उंब्रटकर, आपाजी पोळ, चंदर दिघे, उंबर्डे गावचे सरपंच भाऊ उंब्रटकर, तसेच अक्षय धुमाळ यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.










