आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामास सुरुवात; बनेश्वर मंदिर रस्ता २० दिवस वाहतुकीस बंद


नसरापूर, ता. भोर (प्रतिनिधी) : तालुक्यातील नसरापूर ते श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिर या महत्त्वाच्या मार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामास अखेर सुरुवात करण्यात आली असून कामाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता पुढील २० दिवसांसाठी वाहतुकीस पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भाविक व वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्तीच्या कामासाठी सुरू होता. या अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येत असून बाजूच्या जुन्या संरक्षक भिंती पाडून नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. आतापर्यंत काम सुरू असताना एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती; मात्र मंगळवार (ता. २४) पासून सिमेंट काँक्रिटीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

या काळात बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना जानकीराम मंगल कार्यालयाजवळ वाहने उभी करून पुढे पायी जावे लागणार आहे. तसेच बनेश्वर मार्गे केळवडे गावाकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी नसरापूर–चेलाडी महामार्गाचा पर्यायी मार्ग वापरावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे व साताऱ्याकडून येणाऱ्या भाविकांनी देखील नसरापूरमार्गे न येता केळवडे गावातून मंदिराकडे जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, बनेश्वर देवस्थान मंदिर विकास आराखड्यातून प्रलंबित राहिलेल्या या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. यावेळी प्रशासक सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच नामदेव चव्हाण, संदीप कदम, सुधीर वाल्हेकर, सुनीता कदम, दीपाली वाल्हेकर यांच्यासह पीएमआरडीएचे सल्लागार धीरज गायकवाड, सबठेकेदार सूरज मरळ, अमित पवार, नवनाथ शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

काम सुरू झाल्यापासून ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्यांनी काम अंदाजपत्रकानुसार आणि दर्जेदार व्हावे, अशी मागणी सातत्याने केली होती. त्यानुसार पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून ठेकेदारास आवश्यक सूचना दिल्या आहेत. सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा दर्जा उत्कृष्ट ठेवावा, अशी मागणी प्रशासक सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच नामदेव चव्हाण व संदीप कदम यांनी यावेळी केली.

रस्त्याचे एका बाजूचे काँक्रीट काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने दुसऱ्या बाजूचे काम हाती घेण्यात येणार असून या संपूर्ण कालावधीत रस्ता बंद राहणार आहे. गावात ये-जा करताना अडचणी निर्माण होणार असल्याने नागरिक व भाविकांनी सहकार्य करावे, तसेच नियमांचे उल्लंघन करून वाद घालणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला‏ आहे.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!