भोर तालुक्यातील आळंदे परिसरातील सिमेंट रस्त्यावर करण्यात आलेल्या मोरीच्या कामामध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. यासंदर्भात भोर तालुका प्रमुख दशरथ ज्ञानोबा गोळे आणि भरत नाना साळुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मौजे आळंदे (ता. भोर) येथील रस्त्याच्या कॉर्नरवर पूर्वी जुनी मोरी अस्तित्वात होती. नवीन सिमेंट रस्त्याचे काम झाल्यानंतर या ठिकाणी पूर्णपणे नवीन व सुरक्षित मोरी बांधणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता एका बाजूला जुनी मोरी कायम ठेवून दुसऱ्या बाजूला अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
सदर कामामध्ये आवश्यक तांत्रिक निकष पाळले गेले नसून कंत्राटदाराने पूर्ण नवीन बांधकाम न करता जुन्या संरचनेवरच काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मोरी कोसळण्याची तसेच नागरिक व वाहनचालकांच्या अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मोरीच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठडे किंवा रेलिंग नसल्याने नागरिक व पादचारी खाली पडण्याची शक्यता असून तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निकृष्ट काम तातडीने काढून टाकून पूर्णपणे नवीन मोरीचे बांधकाम करण्यात यावे, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख दशरथ ज्ञानोबा गोळे व भरत नाना साळुके यांनी दिला आहे.










