आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

भोर तालुक्यात औद्योगिकीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर ; बेरोजगारी वाढीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रशासनाला निवेदन ३३६ एकर औद्योगिक भूखंडावरील विक्री थांबवण्याची मागणी – अन्यथा आंदोलनाचा इशारा


भोर तालुक्यात वाढत चाललेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर औद्योगिकीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, उत्रौली येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहत दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. तालुका प्रमुख दशरथ गोळे व तालुका प्रमुख भरत नाना साळुके यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भोर तालुक्यात रोजगाराच्या संधी कमी होत असून युवकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे. उत्रौली येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहत राजकीय अनास्था व प्रशासकीय उदासिनतेमुळे रखडली असून, त्यावर ठोस निर्णय घेण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भोर शहरालगत पूर्वी सुमारे ३३६ एकर क्षेत्र औद्योगिकीकरणासाठी उपलब्ध होते. या परिसरात आरलॅब्ज, नीरा पेपर मिल, लक्ष्मी टेक्सटाईल, मार्कंडेय इंडस्ट्रीज तसेच भोर इंडस्ट्री यांसारखे नामांकित उद्योग कार्यरत होते. मात्र कालांतराने हे उद्योग बंद पडल्याने अनेक कामगार बेरोजगार झाले व त्यांच्या देणग्याही थकीत राहिल्या, असे निवेदनात नमूद आहे.

सध्या या उद्योगांची जमीन खाजगी मालकीत जाऊन गुंठेवारी पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध होत असल्याचा आरोप करण्यात आला असून, पश्चिम घाट संवर्धनामुळे नवीन उद्योगांना मर्यादा असताना उपलब्ध औद्योगिक जमीन खाजगी विकासकांना कशाच्या आधारे विक्रीस परवानगी देण्यात आली, याबाबत प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तालुक्याचे हक्काचे औद्योगिक क्षेत्र पुन्हा औद्योगिक वसाहतीसाठी उपलब्ध करून देण्यात यावे तसेच संबंधित भूखंडांची विक्री तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

यावेळी मा. उपतालुकाप्रमुख नारायण वीर, शहरप्रमुख चंदन कोळसकर उपस्थित होते.


  • 👍
97
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!