प्रतिनिधी : राजेंद्र रणखांबे | राजगड
राजगड किल्ल्यावर येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवश्यक त्या मूलभूत सेवा व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाढत्या पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्यावर सध्या असलेल्या अपुऱ्या सुविधांमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दिलेल्या निवेदनात आमदार मांडेकर यांनी म्हटले आहे की, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेल्या किल्ले राजगडाचा जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश झाल्यानंतर येथे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, किल्ल्यावर आवश्यक सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पर्यटकांच्या सुरक्षितता व सोयी लक्षात घेऊन किल्ल्यावर जीपीएस व मोबाईल नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देणे, किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्ते व पायवाटांवर दिशादर्शक फलक उभारणे, तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. धोकादायक ठिकाणी मजबूत रेलिंग बसवून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय किल्ल्यावर अधिकृत व प्रशिक्षित पर्यटक मार्गदर्शक (गाईड) नेमावेत, राजगड पायथ्याशी असलेल्या गावांची समन्वय बैठक घेऊन स्थानिकांचा सहभाग वाढवावा, तसेच किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटा सुरक्षित करून त्यांची दुरुस्ती व संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची (फिल्टरयुक्त) व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी सुसज्ज वैद्यकीय किट व प्राथमिक उपचार केंद्र उभारण्याची आवश्यकता देखील त्यांनी व्यक्त केली.
राजगड किल्ल्याचा पर्यटन विकास आणि वारसा संवर्धन यांचा समतोल राखत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत ही सर्व मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.










